Chhatrapati Sambhajinagar : घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारासाठी तीव्र आंदोलन
घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियमित पगारासाठी आज आयटक (AITUC)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले. अनेक महिन्यांपासून वेळेवर पगार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व अभय टाकसाळ यांनी केले.
कोविड काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पगार, पीएफ व ईएसआयसी सुविधा वेळेवर न मिळाल्याने नाराजीचे वातावरण आहे. टाकसाळ यांनी प्रशासनाकडे हे कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे.
आंदोलनादरम्यान गोंधळ
प्रसंगी आंदोलनकर्ते आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली. गोंधळात एका महिला कर्मचाऱ्याची तब्येत बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापित केली.
"टाळ्या-थाळ्या वाजवल्या, पण..." – अभय टाकसाळ
या आंदोलनादरम्यान अभय टाकसाळ म्हणाले, "कोविड काळात या कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, फुले उधळली, पण त्यांच्या थाळीत काहीच नाही. आज त्यांना वेळेवर पगारही मिळत नाही. 7 तारखेपूर्वी संपूर्ण पगार मिळावा, अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल."
"संघटनेचे आंदोलन चुकीच्या पद्धतीने" – डॉ. शिवाजी सुक्रे
घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार हा संबंधित कंत्राटदाराकडून दिला जातो. आंदोलनकर्त्यांनी माझे वाहन अडवले, जे चुकीचे आहे. यापूर्वीही संघटनेने अशा प्रकारचे आंदोलन केले असून त्याचा रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होत आहे."